सर्वांगीण स्वातंत्र्य व सुधारणांचे पुरस्कर्ते

Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar

डॉ. रविनंद नामदेव होवाळ

एक मालक जाऊन दुसरा मालक येणे म्हणजे स्वराज्य नव्हे, स्वराज्य म्हणजे आमच्यावर राज्य नव्हे, तुमचे स्वातंत्र्य हे आमचे पारतंत्र्य ठरू नये, अशा शब्दांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्याबाबतची भूमिका व्यक्त केली होती… डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त खास लेख.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे भारतीयांनी आजवर पददलितांचे कैवारी या नात्याने प्रामुख्याने पाहिलेले असले, तरी इतर अनेक क्षेत्रांत त्यांनी दिलेले योगदान व मांडलेल्या भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण व उपयुक्त अशा आहेत. डॉ. आंबेडकर हे भारतीय पददलितांचे कैवारी असण्याबरोबरच सर्व भारतीयांच्या संपूर्ण स्वातंत्र्याचे आणि अखिल मानवजातीसाठीच्या सर्वांगीण सुधारणांचेही पुरस्कर्ते होते! विविध ठिकाणी विविध विषयांच्या अनुषंगाने त्यांनी घेतलेल्या भूमिका व मांडलेले विचार यातून हे सुस्पष्ट होते.

बाबासाहेबांच्या मनात अन्यायाविरुद्ध कमालीची चीड होती व ही चीडच सर्व प्रकारच्या अन्यायाविरोधात लढण्यासाठीची त्यांची सर्वात मोठी ताकद बनलेली होती. सामाजिक बाबतीत ते स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्यायाचे कैवारी होते. माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. त्यांच्या काळातील भारतातील अनुसूचित जाती-जमातींचा वर्ग प्रस्थापितांच्या वर्चस्वाखाली अमानुषपणे भरडला जात असल्यामुळे या सर्व शोषितांना राष्ट्रीय पातळीवर संघटित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हे ऐक्य त्यांना या जातींपुरतेच मर्यादित ठेवायचे नव्हते. पुढे जाऊन सर्व बहुजनांना व त्याहीपुढे जाऊन अखिल भारतीय समाजाला एका समतेच्या व बंधुतेच्या धाग्यात ते गुंफू इच्छित होते. खरे तर यानंतरही त्यांना थांबायचे नव्हतेच! संपूर्ण भारतात सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक क्रांती घडवल्यानंतर तिचे लोण त्यांना संपूर्ण जगात पोहोचवायचे होते! त्यांनी वेळोवेळी मांडलेल्या अनेक भूमिकांतून ही बाब सुस्पष्ट झालेली आहे.

आर्थिक समतेशिवाय भारतात खरी समता येणार नाही, हे जाणून बाबासाहेबांनी ‘राज्य समाजवादा’ची संकल्पना मांडली; पण भारतीय संविधानात त्यांना ती पुरेशा प्रमाणात उतरवता आली नाही. मार्गदर्शक तत्त्वांत काही तरतुदी करण्यावरच त्यांना समाधान मानावे लागले. भारतातील सर्व महत्त्वाचे उद्योग, विमा व शेती या तिन्ही गोष्टी ‘राज्या’च्या ताब्यात देऊन त्यांच्या सहाय्याने तमाम भारतीयांचा सर्वांगीण उद्धार करावा, असा त्यांचा आग्रह होता. आर्थिक क्रांतीच्या मदतीने कामगारांचे दारिद्य्र संपविण्याच्या कार्ल मार्क्स यांच्या हेतूविषयी बाबासाहेबांच्या मनात कोणतीही शंका नव्हती. ती नसल्यामुळेच त्यांनी कार्ल मार्क्स यांची गौतम बुद्धांसोबत तुलना केली. परंतु; मार्क्सच्या मार्गाने होऊ शकणार्‍या केवळ आर्थिक क्षेत्रातील रक्तरंजीत क्रांतीचा मार्ग व या क्रांतीचा परिणाम त्यांना योग्य व पुरेसा वाटत नव्हता. त्यांना सनदशीर, अहिंसक व सर्वांगीण अशी क्रांती हवी होती. ही क्रांती सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांत झाली पाहिजे, असे त्यांचे मत होते. ती केवळ बुद्धांच्या मार्गानेच घडवून आणता येईल, अशी खात्री त्यांना वाटत होती. मार्क्स व बुद्ध या दोन पर्यायांतून त्यामुळेच त्यांनी बुद्धांची निवड केली.

परराष्ट्र व्यवहारात त्यांना अलिप्तता मान्य नव्हती. या अलिप्ततेतून कम्युनिस्ट चीन व रशियाच्या कचाट्यात भारत सापडेल, असा इशारा त्यांनी दिला होता. रशियातील कम्युनिस्ट राजवट फार दिवस टिकणार नाही. कारण, ती बळाच्या आधारे लादलेली राजवट आहे, असे भाकीतही त्यांनी केले होते. 1990 साली ते खरे ठरले! बाबासाहेबांना पाकिस्तानशी वैरही नको होते. त्यावेळच्या साडेतीनशे कोटींच्या बजेटपैकी तब्बल एकशे ऐंशी कोटी रुपये आपण संरक्षणावर खर्च करत आहोत, याकडे लक्ष वेधून या खर्चालाही त्यांनी मोठा विरोध केला होता.

ब्रिटीश लोक भारतातून निघून गेल्यानंतर मिळणारे राजकीय स्वातंत्र्य त्यांच्यासाठी पुरेसे नव्हते. त्यांना सर्व भारतीयांचे संपूर्ण स्वातंत्र्य हवे होते. ब्रिटिशांच्या हातातली सत्ता नेमकी कोणाच्या हाती जाणार, हा प्रश्न त्यांच्या द़ृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. एक मालक जाऊन दुसरा मालक येणे म्हणजे स्वराज्य नव्हे! स्वराज्य म्हणजे आमच्यावर राज्य नव्हे! राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे! तुमचे स्वातंत्र्य हे आमचे पारतंत्र्य ठरू नये, अशा शब्दांत त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे. ती करताना सर्व भारतीयांसाठी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी त्यांनी केली.
मोठ्या जमीनदारांच्या वर्चस्वापासून छोट्या शेतकरी कुळांचे व शेतमजुरांचे रक्षण, भांडवलदारांच्या वर्चस्वापासून कामगारांचे रक्षण, पुरुषांच्या वर्चस्वापासून स्त्री वर्गाचे रक्षण, बहुसंख्याकांच्या वर्चस्वापासून अल्पसंख्याकांचे रक्षण व प्रस्थापितांच्या वर्चस्वापासून पददलितांचे रक्षण करणे अशा विविध कार्यांसाठी त्यांनी आयुष्य खर्ची घातले. दुर्दैवाने पददलितांच्या संरक्षणाव्यतिरिक्त बाबासाहेबांच्या इतर क्षेत्रांतील योगदानाची पुरेशी चर्चा आपल्याकडे अजूनही झालेली नाही. ती झाली, तरच खरे बाबासाहेब आपल्याला योग्य प्रकारे समजू शकतील. 1939 ते 1951 या काळात हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना विवाह, संपत्ती, वारस, दत्तकविधान इत्यादी क्षेत्रांत त्यांनी समानता मिळवून देण्याचा प्रयत्न केला. कामगारांच्या हितासाठी पगारी रजा, कामाचे तास निश्चित करणे, स्त्री-कामगारांसाठी प्रसूती रजा व इतर सुविधा, कामगार-मालक लवादाची निर्मिती, एम्प्लॉयमेंट एक्सचेंजची स्थापना अशी अनेक महत्त्वपूर्ण कामे त्यांनी मार्गी लावली.
महापुरापासून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी दामोदर खोर्‍यासारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लावले. याबाबतची एक आठवण अशी की, हे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ब्रिटीश इंजिनिअरला भारतात बोलावण्याची व्हाईसरॉयची मागणी बाबासाहेबांनी फेटाळली होती. तुमच्या देशात आमच्या देशातल्यासारख्या विस्तीर्ण नद्या नाहीत; त्यामुळे तुमच्या इंजिनिअरचा अनुभव इथे तोकडा पडेल, असे म्हणत अमेरिकेतल्या टेनेसी व्हॅली प्रकल्पावरील वुरदुईन या अमेरिकन अभियंत्याला बोलावून हे काम त्यांनी त्याच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास नेले होते. खोसला नावाचे एक मोठे अभियंते वर्णवर्चस्वाच्या भावनेतून या काळात बाबासाहेबांच्या हाताखाली काम करायला तयार नव्हते. बाबासाहेबांनी त्यांना बोलावले व ‘आपल्याला नवा भारत उभा करायचा आहे’ याची त्यांना जाणीव करून दिली. खोसला वरमले आणि काम करायला तयार झाले. माणसातील माणुसकी जागविणारे, त्याच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे व त्याला सुयोग्य दिशेला नेणारे, प्रज्ञावंत बाबासाहेब!!

Back to top button