सीरियल किलर – ‘या’ ठगाने तब्बल ९३१ हत्या केल्या, गिनीज बुकने घेतली दखल

अर्जुन नलवडे, पुढारी ऑनलाईन

मध्ययुगीन भारताच्या इतिहासात असा एक सीरियल किलर होऊन गेला, ज्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांनाही नाकी नऊ आणले होते… इतकंच नाही त्याच्या शोधासाठी इंग्लंडमधून ब्रिटिशांचे तपास अधिकारी यायचे त्यांचीही तो हत्या करायचा… व्यापारी, पर्यटक आणि तिर्थयात्रेला निघालेल्या भक्तांनी त्याचं नाव जरी ऐकलं तरी आपला रस्ता बदलायचे… एक नाही, दोन नाही, तीन नाही… तर तब्बल ९३१ हत्या त्याने केलेल्या होत्या, त्याच्या या कुख्यात कर्तृत्वाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डने घेतली आहे… स्वतःचा २०० लुटारू आणि खुन्यांचा त्याचा समूह होता… त्याने स्वतः सांकेतिक भाषा निर्माण केली होती… तब्बल १० वर्षं तो ब्रिटिशांच्या हाती लागला नाही…. कोण आहे हा बहाद्दर? जाणून घेऊ…

गुन्हेगारी विश्वात पहिलं पाऊल

तर, याचं क्रूर गुन्हेगाराचं नाव आहे बहराम ठग. १७६५ मध्ये जबलपूरमध्ये (आताचे मध्यप्रदेश) बहरामचा सामान्य घरात जन्म झालेला होता. लहानपणी साधासुदा असणारा बहरामचा संपर्क कुख्यात ठग सय्यद अमीर अलीशी आला. अमीर अली हा बहारामपेक्षा २५ वर्षांनी मोठा होता. त्यानं ठगांच्या विश्वाची ओळख करून दिली. कालांतराने बहराम ठगांचा म्होरक्या झाला. त्याच्यासोबत एक महिलाही काम करत होती. तिचं नाव डाॅली होतं. मात्र, कालांतराने दोघे वेगळे झाले. वयाच्या २५ व्या वर्षी बहराम ठगांच्या सरदार झाला होता.

… अशी करायचा लोकांची हत्या

हा काळ होता मध्ययुगीन भारताचा. मुगल साम्राज्य अस्ताला जाऊन ब्रिटिशांची सत्ता म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतात प्रस्थापित होत होती. तत्कालीन परिस्थितीत आतासारखी दळणवळणाची साधनंं नव्हती. लोक पायी किंवा बैलगाडी, घोडागाडीने प्रवास करत असतं. तर, मध्यप्रदेशाच्या जंगलातून व्यापारी, पर्यटक, प्रवासी भक्त, नवीन लग्न झालेल्या मुली, श्रीमंत माणसं प्रवास करत असताना अचानक गायब व्हायची. या सर्वांचे अपहरण बहराम आणि त्याचे २०० साथिदार करायचे.
बहराम आपल्याजवळ कायम एक पिवळ्या रंगाचा रुमाल, एक नाणं ठेवत असे. लोकांची हत्या करण्याची हिच त्याची साधणं होती. प्रवाशांचं अपहरण करून ठरलेल्या ठिकाणी त्यांना घेऊन जायचा. एक-एक करून प्रवाशांच्या गळ्यामध्ये ते नाणं अडवून नंतर पिवळ्या रंगांच्या रुमालाने त्यांचा गळा आवळून हत्या करायचा. त्यांच्याकडे असणारं मोल्यवान ऐवज लुटायचा. त्यांचे मृतदेह गटारात फेकायचा किंवा जमिनीत गाडून टाकायचा. त्याचा कारनाम्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. लोक त्याच्या नावाने अक्षरशः कापायचे.

बहरामची स्वतःची सांकेतिक भाषा होती

लोकांचं अपहरण करून त्यांची हत्या करणं आणि त्याचा कुणालाही पत्ता न लागू देणं, यासाठी बहरामने स्वतःची एक भाषाच विकसित केली होती. त्याला ‘रामोसी’ म्हटलं जायचं. ही भाषा एखाद्याची हत्या करताना वापरली जायची. सराईत ठग असणाऱ्याला ‘बोरा’ किंवा ‘ओला’ म्हणत. ठगांच्या म्होरक्याला ‘जमादार’, नाण्यांना ‘गान किंवा खार’, सर्व ठग ज्या ठिकाणी गोळा व्हायचे त्या ठिकाणाला ‘बाग किंवा फूर’, ज्यांचे अपहरण करायचे त्यांच्यावर निगराणी ठेवणाऱ्याला ‘सोथा’, या सोथ्यांना मदत करणाऱ्याला ‘दक्ष’, पोलिसांना ‘डानकी’, अपहरण केलेल्या लोकांची हत्या करणाऱ्याला ‘फांसीगीर’ आणि त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्याला ‘तपोनी’, असे सांकेतिक शब्द वापरले जायचे.

ब्रिटिश तपास अधिकाऱ्यांचीही हत्या

दिल्ली ते जबलपूर रस्त्यादरम्यान असणाऱ्या पोलिस ठाण्यांमध्ये कराची, लाहोर, मंदसौर, मारवाड, काठियावाड, मुर्शिदाबादमधील व्यापाऱ्यांचे जथ्येच्या जथ्ये रात्री गायब झाल्याच्या नोंदी होत होत्या. पोलिसांसमोरील तक्रारींच्या नोंदी वाढत होत्या. त्यामुळे इंग्रजांवरही मोठा दबाव निर्माण झाला. इंग्रजांनी इंग्लंडहून काही बहरामचा शोध घेण्यासाठी पाठविले. त्यांचीही बहरामने निर्घृण हत्या केली. यामुळे इंग्रजाचे पोलिसदेखील बहरामला घाबरू लागले.

कॅप्टन विल्युम स्लिमॅनची नियुक्ती

इंग्रजांची डोकेदुखी ठरलेला बहराम ठगाचा बंदोबस्त करणं आता गरजेचं वाटलं. त्यामुळे एक धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ पोलिस अधिकारी कॅप्टन विल्युम हेनरी स्लिमॅनला भारतात पाठविण्यात आलं. १८२२ मध्ये स्लिमॅनला नरसिंहपूर जिल्ह्याचा मॅजिस्ट्रेट बनविण्यात आला. तो लगेच कामाला लागला. त्याने बहरामबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्याचा लक्षात आले की, बहरामची सांकेतिक अशी रामोसी भाषा शिकणं गरजेचं आहे. स्लिमॅननं भाषा शिकली.
दरम्यान, भारताचे गव्हर्नर जनरल पदावर लाॅर्ड बेटिंक यांची नियुक्ती झाली. त्यांनी बहराठ ठग आणि त्याच्या सहकाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्लिमॅनला सर्व अधिकार दिले आणि त्याच्या साथीला सहकाऱ्यांची फौज दिली. बहरामची टीम जंगलाच लपून बसते, त्यामुळे स्लिमॅनने दिल्ली ते ग्वाल्हैर आणि जबलपूरच्या मुख्य महामार्गालगत असणाऱ्या जंगलंच कापून टाकली. पण, बहरामचा शोध लागला नाही.
कॅप्टन स्लिमॅनला बहारामचा गुरू सय्यद अमिर अलीच्या ठिकाणाची माहिती मिळाली. ब्रिटिशांची फौज घेऊन स्लिमॅन अलीच्या घरी पोहोचला. परंतु, अमिर अली तेथून फरार झाला. स्लिमॅनने अलीच्या कुटुंबातील सदस्यांना ताब्यात घेतले. शेवटी १८३२ साली अली पोलिसांनी शरण आला. खूप चौकशीअंती अमीर अलीने बहरामच्या बाबतीत पूर्ण माहिती सांगितली. त्याच्या सांगण्यावरून १८३८ मध्ये बहरामला अटक केली.

बहराम ठग आणि त्याच्या सहकाऱ्यांचा अंत

ब्रिटिश पोलिसांच्या हाती लागलेल्या बहराम ठगची चौकशी सुरू केली तेव्हा त्याने लोकांना मारण्याची पद्धत पोलिसांना सांगितली. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ९३१ लोकांना गळफास लावून यमसदनी पोहोचवले होते. त्यात बहरामने स्वतः १५० लोकांची हत्या केली होती. बहरामला अटक झाल्यानंतर त्याच्या २०० साथीदारांनी अटक केली. १८३९ मध्ये बहरामसहित त्याच्या कुख्यात साथीदारांना जबरपूरच्या एका मोठ्या झाडाला दोऱ्यांनी लटकवून फाशी देण्यात आली. जे नुकतेच बहरामच्या समुहात सामील झाले होते त्यांना स्लिमॅनने फाशी न देता एका सुधारगृहात पाठविले. आजही मध्यप्रदेशच्या कटनी जिल्ह्यात स्लिमॅनच्या नावाने स्लीमनाबाद वसविण्यात आले आहे. इतकंच नाही तर, तिथं त्याचे स्मारकही उभे करण्यात आले आहे. असे बहराम ठग पुन्हा निर्माण होऊ नयेत म्हणूनच ठंगाचा बंदोबस्त करण्यासाठी वेगळा कायदा संमत केला. भारताच्या इतिहासात आजही ‘ठगांचा बंदोबस्त’ हे प्रकरण वाचायला मिळते.

Back to top button