पेट्रोल-डिझेल दरात पंधरा दिवसांनंतर कपात

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

सलग पंधरा दिवस इंधनाचे दर स्थिर ठेवल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी गुरुवारी इंधन दरात किरकोळ कपात केली. पेट्रोल दरात 16 पैशांची तर डिझेल दरात 14 पैशांची कपात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जागतिक बाजारात क्रूड तेलाच्या दरात पाच टक्क्यांपेक्षा जास्तची तेजी आलेली असताना इंधन दरात कपात करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून 63 डॉलर्स प्रती बॅरलच्या आसपास असलेले ब्रेंट क्रूड तेलाचे दर आता 66.62 डॉलर्सवर गेले आहेत. दुसरीकडे डब्लूपीआय क्रूड तेलाचे दर 63.03 डॉलर्सवर गेले आहेत. ताज्या दरकपातीनंतर देशाची राजधानी दिल्लीतील पेट्रोलचे प्रतिलीटरचे दर 90.56 रुपयांवरून 90.40 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. दुसरीकडे डिझेलचे दर 80.87 रुपयांवरून 80.73 रुपयापर्यंत खाली आले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 96.82 तर डिझेलचे दर 87.81 रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

प. बंगालमधील कोलकाता येथे पेट्रोल व डिझेलचे दर क्रमशः 90.62 आणि 83.61 रुपयांपर्यंत खाली आले आहेत तर चेन्नई येथे इंधन दर क्रमशः 92.43 व 85.73 रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत. याआधी फेब्रुवारी महिन्यात सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कपात केली होती. फेब्रुवारी महिन्यात तेल कंपन्यांनी तब्बल 16 वेळा इंधन दरात वाढ केली होती. त्यावेळी पेट्रोल दरात झालेली वाढ 4.74 रुपयांची होती तर डिझेल दरातील वाढ 4.52 रुपयांची होती. या दरवाढीनंतर गेल्या काही दिवसात इंधन दरात तीनवेळा कपात झाली आहे. या कपातीद्वारे पेट्रोल दरात 61 पैशांची तर डिझेल दरात 60 पैशांची कपात झाली आहे.

Back to top button