राज्य सरकारचे पॅकेज म्हणजे निव्वळ धूळफेक – फडणवीस

नागपूर : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या योजनांच्या आधारे राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे. अनेक लहान घटक मदतीपासून वंचित आहेत, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 14) नागपुरात केला. आदिवासींना दोन हजार रुपये खावटी अनुदान देणे म्हणजे तोंडाला पाने पुसण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.

फडणवीस म्हणाले, सरकारने जाहीर केलेले 5 हजार 300 कोटींचे पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे. 3 हजार 300 कोटींची तरतूद कोरोनासंदर्भात सांगण्यात आली. ती रेग्युलर बजेटमधील तरतूद आहे. आताच्या कोरोना प्रादुर्भावाकरिता हे पैसेे दिलेले नाहीत.
सरकारने शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, केशकर्तनालये, छोटे उद्योग यातील कोणालाही कोणतीही मदत केलेली नाही, असा आरोप करून फडणवीस म्हणाले, खरे म्हणजे, पॅकेजमध्ये दिशाभूल करण्यात आली. वृद्धापकाळ, श्रावणबाळ या केंद्र सरकारच्या योजना आहेत. यामध्ये सरकार अतिरिक्‍त एक हजार रुपये देईल, असे वाटले; पण नवीन पैसा मिळत नसून जो मिळणारच आहे, तो थोडा आगाऊ राज्य सरकार देणार असल्याची टीका त्यांनी केली.

नागपूर, नाशिक, औरंगाबादला आरोग्य सुविधा वाढवा

मुंबई आणि पुणे ही महत्त्वाची शहरे आहेत. मात्र, मुंबई, पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे, हे या सरकारला माहीतच नाही. त्यामुळे नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथे आरोग्य व्यवस्था वाढविण्यासंदर्भात सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही. आजही नागपूरची स्थिती वाईट आहे. सरकार मदत किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही. सरकार किती बेडस्, व्हेंटिलेटर वाढवणार, त्याचा कालावधी काय? यासंदर्भातील माहिती सरकारकडून अपेक्षित होती, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले, अन्‍नसुरक्षा योजनेत अतिरिक्‍त धान्य देण्यात येईल, असे सांगण्यात आले; पण जवळपास 88 लाख लोक अन्‍नसुरक्षा योजनेत नाहीत, ते गरीब आहेत. 2011 मध्ये झालेल्या चुकीच्या सर्व्हेमुळे महाराष्ट्रात अन्‍नसुरक्षा योजनेत ते आले नाहीत. खरा दिलासा त्यांना द्यायला हवा होता.

Back to top button