सोलापूरसह जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

सोलापूर शहर व जिल्ह्यात मंगळवारी दिवसभराच्या ढगाळ हवामानानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर अचानक पावसाने दमदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटांसह शहराबरोबर ग्रामीण भागालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले. मंगळवेढ्यात तर गारा बरसल्या. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आदींसह माढा, करमाळा या तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. सुमारे अर्ध्या तासापेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळेे शेतकरी, फळ बागायतदार चांगलाच धास्तावला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रविवारी आणि सोमवारी पंढरपूर, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तसेच माढा तालुक्यात शेती पिकांसह फळबागांचेही नुकसान केले आहे. तर वीज अंगावर पडून गेल्या दोन दिवसांत सात बैलांचा, तर दोन गायींचा मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. याशिवाय ग्रामीण भागातील अनेकांच्या घरांवरचे पत्रे उडून गेले. आंब्याने लगडलेली झाडेही पावसाने धुवून रिकामी झाली. द्राक्ष, डाळिंब बागांनाही मोठा फटका बसला. शाळू, मका पिकाचेही मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारीही दिवसभर शहरासह जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. त्यात उष्माही मोठ्या प्रमाणात जाणवत होता. परंतु सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाला प्रारंभ झाला. वादळी वारा सुटल्याने शहरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. वार्‍याचा वेग प्रचंड असल्याने काहीजणांच्या घरावर ठेवलेल्या पाण्याच्या टाक्याही उडून रस्त्यावर पडल्या होत्या. वादळी वार्‍यामुळे अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला. काही ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या, तर काही ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.

गेल्या दोन-तीन दिवसात शहर व जिल्ह्यातील वातावरणामध्ये अचानक बदल झाला होता. दुसरीकडे हवामान खात्याने राज्यातच अवकाळी पाऊस येण्याची शक्यता वर्तविली होती. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी पाच वाजल्यानंतर वातावरणात अचानक बदल झाला.
सुरुवातीला प्रचंड विजेचा गडगडाट झाला. पावसात प्रचंड जोर होता. त्यामुळे काही क्षणातच शहरातील रस्त्यावर पाणी वाहू लागले. अनेक ठिकाणी सकल भागात पावसाचे पाणी साचले होते. दिवसभराच्या उकाड्यानंतर पावसाने हवेत गारवा निर्माण झाला होता.
ग्रामीण भागातील मंगळवेढा, अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, माढा, करमाळ्यासह अनेक ठिकाणी या अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेतातील झाडे उन्मळून पडली होती. तर या पावसामुळे द्राक्षबागा आणि फळबागांना मोठा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे फळबागायतदार शेतकर्‍यांनी याविषयी चिंता व्यक्त केली होती. शहरात जवळपास अर्धा तासापेक्षा अधिक काळ पावसाची हजेरी होती. त्यामुळे येणार्‍या-जाणार्‍यांचे मोठे हाल झाले होते.

दुसरीकडे ऐन कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या पावसाने आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. यातून सर्दी, तापाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आरोग्य विभागाच्या वतीने वर्तविण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यात मंगळवारी अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकर्‍यांची हातातोंडाला आलेली द्राक्षबाग या वादळी वार्‍यामुळे उन्मळून पडली होती. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Back to top button