मराठवाड्यात सापडले प्राचीन बेसॉल्ट स्तंभ

औरंगाबाद : जितेंद्र विसपुते

पृथ्वीचे अंतरंग आणि बाह्यावरण याबद्दल कमालीचे कुतूहल आणि आकर्षण आहे. विश्व स्तरावर याबाबत अनेक संशोधने सुरू आहेत. भूगर्भशास्त्राला उभारी देणारे आणि सहा कोटी वर्षांपूर्वीचा वारसा सांगणारी बेसॉल्ट स्तंभांची अति प्राचीन रचना (कॉलम्नर बेसॉल्ट) मराठवाड्यात सापडली आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात सतीगुडा टेकडीत या शीळा असून वन्यजीव विभागातील सहायक वनसंरक्षक डॉ. राजेंद्र नाळे (36) यांनी हा भूगर्भीय वारसा समोर आणला आहे.

पृथ्वीची उत्पत्ती आणि जडणघडणीचे पुरावे भूपृष्टावर जागोजागी दिसतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या बेसाल्टच्या बहुभूज शीळा एक नैसर्गिक चमत्कार मानल्या जातात. किनवट तालुक्यातील सतीगुडा टेकडीत आढळणाऱ्या पंचकोनी तसेच षटकोनी आकाराच्या शीळा देखील ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झालेल्या आहेत. डॉ. नाळे यांनी शोधलेले हे स्थळ भूगर्भशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असून सतीगुडा टेकडीत या जवळपास 700-800 मीटर परिसरात पसरलेले आहे. बेसाल्ट शीळांची या टेकडीत एकूण तीन स्थळे आहेत. या अतिशय आकर्षक शीळांची रुंदी १ मीटरपर्यंत असून लांबी 15-20 फूट इतकी आहे. तर सतीगुडा टेकडी रांग किनवट वनक्षेत्रात (राखीव वन) 1 किमी. परिसरात पसरलेली आहे. सन 2017 मध्ये वनभ्रमंती दरम्यान आपल्याला ही साईट निदर्शनास आली होती अशी माहिती डॉ. नाळे यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

काय आहे बेसाल्ट स्तंभ

बेसाल्ट स्तंभ हे ज्वालामुखीच्या लाव्हा रसामधून खडकाची निर्मिती होत असताना लाव्हारस चहुबाजूने एका मध्याच्या दिशेने सर्व बाजूने सारख्याच अनुपातात थंड होत जातो. त्यावेळी लाव्हारसाच्या आकुंचन पावण्याच्या प्रक्रियेमध्ये बहुभूज प्रकारे एकसंध अशा षटकोनी व पंचकोनी शिळांची निर्मिती होते. प्रत्येक शीळा ही इतर शीळेपासून वेगळी होऊन मधाच्या पोळ्यात असते तशी शिळांची रचना निर्माण होते.

भारतात काही मोजक्याच ठिकाणी अशा बेसाल्ट स्तंभांच्या स्थळांची नोंद आजपर्यंत घेण्यात आलेली आहे. यात सेंट मेरी आईसलॅण्ड (कनार्टक), गीलबर्ट बेट मुंबई, देवास (मध्य प्रदेश) आणि बंदीवाडे (जि. कोल्हापूर) या स्थळांचा समावेश होतो. या नोंदीत आता मराठवाड्याचा समावेश झाला असून ही नोंद राज्यातील तिसरी तर देशातील पाचवी ठरणार आहे. डॉ. नाळे हे मूळचे सातारा जिल्ह्यातील असून 2016 पासून ते मराठवाडा वन विभागात कार्यरत आहेत. त्यांनी पशुवैद्यकशास्त्र पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहे.
शीळा स्तंभाचा शोध मराठवाड्याच्या भूगर्भीय वारसेला समृद्ध करणारा

वनभ्रमंती दरम्यान 2017 मध्ये शीळा आढळून आल्या. सतीगुडा टेकडीत हे स्थळ असून अशा आणखी दोन साईट येथे आहेत. याचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू केला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात रिसर्च पेपर प्रसिद्ध करणार आहोत. शीळा स्तंभाचा शोध मराठवाड्याच्या भूगर्भीय वारसेला समृद्ध करणारा आहे. देशातील ही पाचवी नोंद ठरणार आहे.
– डॉ. राजेंद्र नाळे, संशोधन कर्ता. औरंगाबाद.

Back to top button