मान्सून वेळेत न आल्यास गोव्यात पाणी टंचाईचे संकट

मडगाव/डिचोली/काणकोण: पुढारी वृत्तसेवा
उन्हाळ्याच्या झळा जसजशा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत, तसतशी नागरिकांची पाण्याची मागणीही वाढत आहे. एप्रिलच्या मध्याअखेरपर्यंत गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याची पातळीत बरीच घट झाल्याचे दिसत आहे. साळावली, आमठणे व चापोली धरणातील पाणीसाठा पाहिला असता ती बाब चिंताजनक दिसून येत आहे. जून महिन्यात मान्सून वेळेत नाही आला; तर पाणी टंचाईला तोंड द्यावे लागू शकते, अशी भीती पाण्याच्या मागणीवरून वाटू लागली आहे.

दक्षिण गोव्याबरोबर खांडेपार येथील ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा करणार्‍या साळावली धरणाच्या जलाशयात सध्या 106 दशलक्ष क्यूबिक मीटर एवढाच पाणी साठा शिल्लक आहे. गत वर्षाच्या तुलनेत चार दशलक्ष क्युबिक मीटर पाण्याचा तुटवडा यंदा निर्माण झाला आहे. शिल्लक असलेल्या 47 टक्के पाण्यावर अणखी काही आठवडे गोमंतकियांना काढावे लागणार आहेत.

गतवर्षी 14 एप्रिलपर्यंत साळावली धरणातील पाणीसाठा 34.66 मीटर एवढा होता. यंदा उकाड्याबरोबर पाण्याचा वापरसुद्धा वाढला आहे. त्यामुळे सध्या पाण्याचा साठा 34.43 एवढा उरला आहे. गतवर्षीची तुलना केली तर एप्रिल महिन्याच्या मध्यंतरी पाणी साठा 110 दशलक्ष क्युबिक मीटर एवढा होता. यंदा बारा एप्रिलपर्यंत तो 107 दशलक्ष क्युबिक मीटरवर पोहोचला आहे. जलस्रोत खात्याच्या अधिकार्‍यांच्या माहितीनुसार धरणात आता केवळ 47 टक्के पाणी शिल्लक आहे. मान्सूनचे आगमन होईपर्यंत हे पाणी संभाळून वापरावे लागणार आहे.

प्राप्त माहितीनुसार दर दिवशी कृषी वापराबरोबर ओपा येथील पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी कालव्याच्या माध्यमातून 11.5 क्युबिक मीटर प्रति सेकंद याप्रमाणे साळावली धरणातून थेट काले नदीत पाणी सोडले जाते. त्याशिवाय जायकाच्या प्रकल्पाला पाणी दिले जाते. दवरलीमधून पाणी खेचून ते वेर्णा औद्योगिक वसाहत, जुआरी अ‍ॅग्रो केमिकल आणि मुरगाव तालुक्याला पुरविले जाते.

Back to top button