यंदा सर्वत्र मुबलक पाऊस पण आरोग्याचा प्रश्न भेडसावणार, संत गोदड महाराज संवत्सरीचे भाकीत

कर्जत : गणेश जेवरे

यावर्षी सर्वत्र मुबलक पाऊस पडणार असून पिके देखील चांगली येणार आहे. मात्र यावर्षीदेखील आरोग्याचा प्रश्न जनतेला भेडसावणार आहे. आखाती देशांमध्ये युद्ध होऊन नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये येईल. याचा जगभरातील जनतेला व राजाला त्रास होणार आहे, असे भाकीत कर्जत येथील संत गोदड महाराज यांच्या संवत्सरीमध्ये व्यक्त करण्यात आले.

कर्जत येथील थोर संत सद्गुरु गोदड महाराज यांनी साठ वर्षाची संवत्सरी लिहून ठेवली आहे. यामध्ये पीकपाणी, राजकारण, संकटे, नैसर्गिक आपत्ती याबाबत भाकीत करून ठेवले आहे. याचे वाचन दरवर्षी चैत्र पाडव्याच्या दिवशी मंदिरांमध्ये करण्यात येते.
गोदड महाराज मंदिराचे विश्वस्त पुजारी पंढरीनाथ महाराज काकडे व अनिल महाराज काकडे यांनी या संवत्सरीचे वाचन आज केले.

दरवर्षी हे भाकीत ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने नागरिक येथे असतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे भाविकांना येण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. यामुळे मंदिरामध्ये पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत याचे वाचन करण्यात आले. वर्षभर शेतकरी, नागरिक या भाकितांची वाट पाहत असतात. अखेर त्याचं वाचन आज या ठिकाणी सर्व नियम पाळून करण्यात आले.

यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडणार आहे. पिके देखील चांगली येणार आहेत. मात्र आखाती देशांमध्ये आगी लागण्याच्या घटना घडणार आहेत. याशिवाय पश्चिम विभागामध्ये चक्रीवादळाचा धोका संभवणार आहे. यामुळे अराजकता माजणार असून आखाती राष्ट्रांमध्ये पुन्हा युद्ध भडकून याचा त्रास राजा आणि जनतेला होणार आहे. यावर्षीदेखील आरोग्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा राहणार आहे, असे या भागांमध्ये सांगण्यात आले आहे. हे भाकीत संपूर्ण जगाच्या बाबतीत वर्तविले जाते.

Back to top button