शेतीउपयोगी यंत्रे खरेदी करताना…

शेतीविषयक अवजारे आणि त्यांची माहिती
शेतीविषयक अवजारे

सतीश जाधव

(लेखक शेतीविषयक प्रश्नांचे अभ्यासक आहेत)

भारतातील शेतीच्या विकासात कृषीउपयोगी यंत्रांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. विकसित यंत्रांच्या योग्य वापरामुळे तांत्रिक शेती शक्य झाली. या यंत्रांची खरेदी आणि शेतीचे व्यवस्थापन याविषयी निर्णय कसे घ्यायचे हे समजून घेण्यासाठी शेतकर्‍यांनी वेगळ्या द‍ृष्टिकोनातून विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, कोणत्या आकाराचे यंत्र खरेदी करावे? नवे यंत्र खरेदी करावे की वापरलेले? यंत्रामध्ये कोणत्या सुविधा असणे गरजेचे आहे? जुने यंत्र केव्हा बदलले पाहिजे? हे आणि असे सर्व निर्णय ‘लोक काय म्हणतील?’ याचा विचार न करता घेतले पाहिजेत.

शेतीच्या विकासात शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या यंत्रांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. भारतातील शेतीचा विकास अशा यंत्रांमुळेच शक्य झाला आहे. परंतु, ही यंत्रे खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जमिनीच्या आकारानुसार आणि प्रकारानुसार ट्रॅक्टर आणि अन्य यंत्रसामग्रीची निवड करायला हवी. शेतजमिनीच्या आकारानुसार शेतकर्‍यांचे पाच गट पाडण्यात येतात.

अल्पभूधारक शेतकरी, छोटे शेतकरी, छोटे-मध्यम शेतकरी, मध्यम शेतकरी आणि मोठे शेतकरी असे ते गट होत. अल्पभूधारक शेतकरी आणि छोट्या शेतकर्‍यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी विचार करायला हवा. कारण जमीन कमी असल्यामुळे ट्रॅक्टर घेणे सोपे नसते आणि त्याचा लाभ किती काळासाठी मिळेल, सांगता येत नाही. त्याऐवजी शेतीयोग्य जमीन कमी असल्यास पॉवर टिलरचा पर्याय चांगला. टिलरमुळे नांगरट, पेरणी आदी कामे छोटा शेतकरी उत्तम प्रकारे करू शकतो. हे एक अत्यंत छोटे शेतीउपयोगी यंत्र असून, लहान शेतकर्‍यांना लाभप्रद आहे.

काळ्या जमिनीत लागणारी अवजारे

शेतीचा आकार थोडा मोठा असल्यास अधिक क्षमतेचे, अधिक किमतीचे आणि अधिक ऊर्जा असलेले टिलर उपलब्ध आहेत. छोट्या शेतकर्‍यांसाठी कमी ऊर्जा असलेली यंत्रसामग्री पुरेशी असते. कोणतेही यंत्र भाड्याने घ्यायचे असेल, तरी ते आवश्यक असलेल्या क्षमतेचेच घेणे चांगले. ट्रॅक्टर किंवा अन्य यंत्रांच्या निवडीपूर्वी शेतकर्‍यांनी पिकाचाही विचार करणे गरजेचे आहे. जी पिके काळ्या जमिनीत घेतली जातात किंवा ज्या पिकांची पेरणी आणि रोपण ओल्या जमिनीत करण्यात येते, अशा जमिनीसाठी अधिक अश्‍वशक्‍तीच्या ट्रॅक्टरची गरज असते. उदाहरणार्थ, भातरोपांची लागण, उसाची लागण इ. पांढर्‍या जमिनीसाठी कमी अश्‍वशक्‍तीचा ट्रॅक्टर चालतो.

शेतातील पिकाची निवडही मातीच्या प्रकारानुसार करणे आणि त्यानुसार यंत्रांची निवड करणे इष्ट ठरते. कारण कामासाठी लागणार्‍या ऊर्जेची गरजही मातीच्या प्रकारानुसार बदलते. पाण्याने भरलेल्या शेतात काम करतानाची परिस्थिती आणि कोरड्या रानात काम करतानाची परिस्थिती भिन्‍नभिन्‍न असते. यंत्राचे डिझाईन आणि संरचना त्यानुसार असावी. उदाहरणार्थ, तण काढणार्‍या यंत्राची क्षमता गव्हाच्या शेतासाठी वेगळी तर भाताच्या पिकासाठी वेगळी असणे अपेक्षित असते.

शेतीविषयक अवजारे
शेतीविषयक अवजारे

शेतीउपयुक्‍त यंत्रसामग्रीची खरेदी करताना उपलब्ध ऊर्जास्रोतांचा विचार करणेही क्रमप्राप्त असते. भारतात शेतीसाठी मानवी शक्‍ती, पशूंची शक्‍ती, विद्युत ऊर्जा तसेच पेट्रोल, डिझेल आणि रॉकेलपासून मिळणार्‍या ऊर्जेचा वापर करण्यात येतो. याखेरीज बायोगॅस, सौरऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापरही वाढत आहे. आपल्याला सहजगत्या उपलब्ध होणारा ऊर्जास्रोत कोणता आहे, याचा विचार यंत्र खरेदी करताना केला पाहिजे. त्याचप्रमाणे जो ऊर्जास्रोत वापरायचा आहे, तो आर्थिकद‍ृष्ट्या आवाक्यात आहे का, याचाही विचार आवश्यक आहे. शेतकर्‍यांनी यंत्रसामग्री खरेदी करताना स्वतःच्या आर्थिक स्थितीचा विचार प्रामुख्याने करणे गरजेचे असते. शेतीउपयोगी यंत्रसामग्रीमध्ये आधुनिकीकरण आल्यामुळे सर्वच यंत्रांचे दर वाढले आहेत. यंत्राची किंमत, उपयुक्‍तता आणि आर्थिक परिस्थिती याचा तौलनिक विचार शेतकर्‍यांनी करायला हवा. आपले आर्थिक सामर्थ्य आणि आवश्यकतेचा विचार करूनच यंत्र निवडावे. त्याचप्रमाणे खरेदी करीत असलेले यंत्र भविष्यात किती उपयोगी ठरेल, याचाही विचार केला पाहिजे. कोणतेही यंत्र खरेदी करताना ते यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण कसे मिळणार, हा प्रश्‍न पडायला हवा. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाची क्षमता ते यंत्र चालविण्याजोगी आहे का, याचा विचार करूनच यंत्र खरेदी करावे.

शेतीविषयक अवजारांचे प्रशिक्षण

यंत्र चालविण्याइतके प्रशिक्षित कुणी नसल्यास देशात अनेक ठिकाणी शेतीउपयोगी यंत्रसामग्री चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाते, हे लक्षात घ्यावे. हिसार, बुधनी, अंतपूर आणि गुवाहाटी या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची सोय आहे. यंत्र चालविण्यासंबंधी संपूर्ण माहिती असल्यास त्याचा वापर आणि देखभाल या दोन्ही गोष्टी सोप्या होतात. परंतु, एखाद्या यंत्राचा उपयोग कसा करायचा हे ठाऊक नसल्यामुळे काही शेतकरी गरज आणि क्षमता असूनही एखादे यंत्र खरेदी करण्यास टाळाटाळ करतात. अशा वेळी प्रशिक्षणाचा पर्याय उत्तम. केवळ वापर करता येत नाही म्हणून यंत्र भाड्याने घेणेही शेतकरी टाळतात. त्यामुळे यंत्र खरेदी करणार्‍याला भाड्यापोटी अपेक्षित उत्पन्‍न मिळत नाही. त्यामुळे असे यंत्र खरेदी करण्याचे प्रमाणही कमी राहते. तांत्रिक माहिती असल्यास यंत्राची देखभाल, दुरुस्ती आणि संचालन सोपे जाते. यंत्रात बिघाड झाल्यास त्याचे सुटे भाग जवळपास कुठे मिळतात याची माहितीही असायला हवी. ही माहिती यंत्र खरेदी करतानाच घेतली पाहिजे. कोणत्याही यंत्राचा व्यावसायिक वापर करण्यासाठी खरेदी केलेले यंत्र भाड्याने देण्याचा पर्याय डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.

आपल्या परिसरात संबंधित यंत्राची उपलब्धता किती प्रमाणात आहे आणि आवश्यकता किती प्रमाणात आहे, याचे गणित मांडल्यास आवश्यकतेच्या तुलनेत उपलब्धता कमी आहे की अधिक आहे, याचा अंदाज येऊन संबंधित यंत्र आपल्याकडून भाड्याने घेतले जाईल का, आणि त्याचा व्यावसायिक उपयोग किती होईल, याचा अंदाज सहज येऊ शकतो. आपण खरेदी करीत असलेल्या यंत्राची परिसरात खरोखर गरज आहे का, याचा विचार शेतकर्‍यांनी करायला हवा. केवळ आपल्या शेतासाठी ते यंत्र उपयोगी असेल तर भाड्याने देऊन व्यावसायिक उपयोग करण्याचा विचार विसरायला हवा. एखाद्या परिसरात एखादे यंत्र अधिक संख्येने उपलब्ध असेल, तर त्याच्या कार्यक्षमतेचा विचार करता उपयोगिता घटते. त्यामुळे व्यावसायिक उपयोगासाठी यंत्र खरेदी करता येत नाही. त्याचप्रमाणे परिसरात मजुरांची उपलब्धता सहजगत्या होऊ शकत असेल, तर मानवचलित छोटी यंत्रे अधिक प्रमाणात वापरणे चांगले असते, हेही लक्षात घ्यायला हवे.

अवजारे खरेदीत ध्यायची काळजी

आपल्याला जे यंत्र खरेदी करायचे असेल, ते आपल्या परिसरात सहजगत्या उपलब्ध आहे का, हाही विचार करायला हवा. यंत्राच्या डीलरने आपल्याला योग्य सेवा वेळोवेळी पुरविणे अपेक्षित असते. त्यासंदर्भात आपल्या परिसरातील डीलरचा अनुभव काय आहे, याची माहिती घेणे इष्ट ठरेल. वेळेला डीलरकडून मदत मिळेल, याची खात्री असल्यास यंत्र खरेदी करणे उत्तम. त्याचप्रमाणे यंत्रात बिघाड निर्माण झाल्यास परिसरात त्याची दुरुस्ती करणारे कोण आहे, डीलरकडून ती करून दिली जाते का, यंत्राचे सुटे भाग उपलब्ध आहेत का, याची सूक्ष्म माहिती घेऊनच यंत्रखरेदीचा निर्णय घ्यावा. यंत्राचे सुटे भाग मिळण्यास विलंब होणार असेल, तर संबंधित यंत्राचा वापर करण्याची वेळ टळून जाते आणि नुकसान होते. त्यामुळेच सुट्या भागांच्या उपलब्धतेचा विचार आधी करणे गरजेचे असते. आपण खरेदी करीत असलेल्या यंत्राला सरकारी यंत्रणेने गुणवत्तेचे प्रमाणपत्र दिले आहे का, याची जरूर माहिती घ्यावी. बीएसआय स्टँडर्ड असलेली यंत्रे खरेदी करणे चांगले.

यंत्रांची खरेदी आणि आर्थिक बाबी यांचा एकत्रित विचार करायला हवा. एखाद्या यंत्रावर सरकारकडून अनुदान दिले जाते. ते किती प्रमाणात मिळते याची माहिती असायला हवी. तसेच पैशांची उपलब्धता नसेल, तर कर्ज मिळू शकेल का, याचा आधी विचार करायला हवा. कृषी यांत्रिकीकरण उप-मिशन (एसएमएएम) नावाच्या योजनेंतर्गत यंत्राच्या किमतीवर 25 ते 50 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळण्याची सोय आहे. तसेच कृषीकार्यासाठी कर्ज देणार्‍या बहुतांश बँका यंत्रे विकत घेण्यासाठी कर्ज देतात. त्याचप्रमाणे कर्जांच्या हप्त्यांची फेड वेळेत केल्यास काही बँका व्याजदरातही सवलत देतात.

अवजारांसाठीचे कर्ज

यंत्रासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना सहामाही किंवा वार्षिक हप्ता भरण्याची सोय असते. या सर्व बाबींची माहिती करून घेऊन आपला जास्तीत जास्त फायदा कसा होईल, याचे गणित शेतकर्‍यांनी मांडायला हवे. याखेरीज यंत्र कसे वापरायचे याची माहिती देणारे ‘मॅन्युअल’ डिलरकडून मागून घ्यावे आणि ते पूर्णपणे वाचून समजून घ्यावे. अनेकदा यंत्रासोबत अ‍ॅक्सेसरीज आणि अन्य काही सुटे भाग विनामूल्य मिळतात. त्याची माहिती पूर्वी यंत्र खरेदी केलेल्या शेतकर्‍यांकडून करून घ्यावी. यंत्रांची दुरुस्ती करण्यासाठी शेतकर्‍यांकडे ‘टूल किट’ असणेही आवश्यक आहे. या सर्व बाबींची माहिती करून घेऊन क्षमतेनुसार, गरजेनुसार यंत्रे खरेदी करावीत आणि त्यांचा वापर फायदेशीर कसा होईल, याचा हिशोब करावा.

Back to top button